पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

महाराष्ट्र

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार

मुंबई: नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसने आता आत्मपरीक्षणाची भूमिका घेतली आहे. या निवडणुकांमधील विजय-पराभवाची कारणे, प्रचारातील रणनीती आणि पक्षांतर्गत समन्वयातील त्रुटींचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीतील कामगिरीचा आता काँग्रेसकडून सविस्तर लेखाजोखा घेतला जाणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून ही समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांचा या समितीत समावेश आहे.

पराभवाची कारणे शोधणार; पक्षांतर्गत समन्वयाचीही तपासणी!

नियुक्त समिती संबंधित तीनही मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणार आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाने राबविलेली प्रचार रणनीती, विजय अथवा पराभवामागील नेमकी कारणे, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थिती आणि पक्षांतर्गत समन्वय यांचा आढावा घेतला जाणार आहे.

निवडणुकीच्या काळात पक्षाच्या पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या, प्रचार आणि नियोजनात काही कमतरता होती का, याचीही तपासणी समितीकडून केली जाणार आहे. याशिवाय मागील निवडणुकांमधील घडामोडींचा सध्याच्या निकालांवर काही प्रतिकूल परिणाम झाला का, याचाही शोध घेतला जाणार आहे.

तीन आठवड्यांत अहवाल; प्रदेश नेतृत्वापुढे शिफारसी मांडणार!

या समितीला आपला सविस्तर अहवाल तीन आठवड्यांच्या आत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे सादर करायचा आहे. या अहवालाची प्रत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही देण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावी करणे, संघटनात्मक त्रुटी दूर करणे आणि निवडणूक व्यवस्थापन अधिक सक्षम बनविणे हा या समितीच्या अभ्यासाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालातून काँग्रेसमधील संघटनात्मक उणिवा आणि निवडणूक रणनीतीतील बदलांबाबत कोणत्या शिफारसी समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत