कांदा निर्यातीवरील बंदी उठवा; अंबादास दानवे

महाराष्ट्र

नागपूर: राज्यात गेल्या वर्षभरात अवकाळी, सततचा पाऊस, संततधार यामुळे मोठया प्रमाणात शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदतीची घोषणा करूनही एक रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांपेक्षाही कमी पीक विम्याची रक्कम जमा करून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचा आरोप करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पीक विमा प्रकरणी सरकारला धारेवर धरले.

अवकाळी पाऊस, पीक विमा, शेतीचे नुकसान, खरीप व रब्बी पिकांचे झालेले नुकसान, कांदा निर्यातबंदी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९७ अनव्ये आक्रमक भूमिका मांडली.

८८ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली मदत मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली.

एकीकडे निसर्ग सतत शेतकऱ्यांवर विविध पध्दतीने हल्ले करत असताना पुन्हा उभारी घेण्यासाठी शेतकरी सरकारकडे मदतीची याचना करत आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १ रुपयाही पीक विम्याची रक्कम जमा केली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मदत देताना कागदपत्रांच्या नावाखाली विविध अटी व शर्थी लावून कमीतकमी शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

कांद्याला मिळणारा ४ हजार रुपयांचा भाव हा निर्यातबंदीमुळे घसरला. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी हटली पाहिजे अशी मागणी दानवे यांनी लावून धरली.

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी मदतीसाठी सरकारकडे डोळा लावून बसले आहेत. मात्र सरकार फक्त अतिवृष्टीच्या मदतीच्या पोकळ घोषणा करत आहे. सरकारने १० हजार कोटी रुपये मदतीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात मदत कुठे दिली याचे कोणतेही उत्तर सरकारने दिले नसल्याचे दानवे म्हणाले.

सरकार सतत शेतकऱ्यांसाठी मदतीच्या घोषणा करून रेटून खोटं बोलत आहे. मोठं घर आणि पोकळ वासा अशी सरकारची स्थिती असल्याची खरमरीत टीका दानवे यांनी केली.

५२ रुपये पीक विम्याची रक्कम घेऊन जाण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरक्षा मागितली तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर व्हावा, पीक विम्याची मदत मिळावी यासाठी शरीराचे अवयवच विकायला काढले अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देत सभागृहाचे या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले.

पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

पीक विम्या कंपन्यांच्या मनमानी कारभारावरही दानवे यांनी बोट ठेवले.

तर इथेनॉल बंदीमुळे सहकार व साखर कारखान्यांची होणाऱ्या नुकसानीकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत नाही, सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही, सरकार फक्त शेतकऱ्यांप्रति बोलघेवड्या घोषणा करत आहे. शेतकऱ्यांकडे अद्याप मदत पोहचली नसल्याने राज्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राजाने लक्ष दिलं नाही तर प्रजा जाणार कुठे अशी व्यथा देखील दानवे यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार डोळेझाक करत असेल तर शेतकरी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच बळीराजा चिडला तर त्यांचा शाप हा धोकादायक असतो. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास कडक तेल घालून सरकारची कान उघडणी करावी लागेल, अशा कडक शब्दांत दानवे यांनी सरकारला सुनावले.