राज्यस्तरीय मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार
पालघर: ठाणे–पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि कोळी बांधवांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या जोरदार लॉंग मार्चनंतर महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. स्थानिक पातळीवरील प्रमुख मागण्या मान्य झाल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्तावित घेराव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माकपने स्पष्ट केले आहे.
दोन दिवस पायी चालत हजारो शेतकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते. लॉंग मार्चच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर स्थानिक मागण्यांवर जिल्हाधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
तसेच, वरकस व बेनामी जमिनी नावे करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माकप व किसान सभेच्या पाच कार्यकर्त्यांचा समावेश असलेली समिती तातडीने गठित करण्यात आली आहे. देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात राज्य सरकार तातडीने कायदा करणार असून, त्याचा मसुदा यावेळी किसान सभेला देण्यात आला.
अकोले ते लोणी लॉंग मार्चदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार वरकस जमिनींबाबत अद्याप कारवाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पालघर लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर यावर ठोस कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. धरणातील पाण्यावर स्थानिकांचा हक्क, सिंचन व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, घराच्या तळ जमिनी नावे करण्याची कार्यवाही तसेच रोजगार हमी कामांची उपलब्धता या मागण्यांनाही मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, वाढवण बंदर व मुरबे बंदर रद्द करण्याची तसेच स्मार्ट मीटर बसविणे तातडीने थांबविण्याची मागणी महाराष्ट्रभरातून होत असून, या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यासाठीचे आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचे माकपने स्पष्ट केले आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेमध्ये माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, माकप जिल्हा सचिव किरण गहला, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या प्राची हातिवलेकर, रडका कलंगडा, लक्ष्मण डोंबरे, लहानी दौडा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.