मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असून दुष्काळ, शेतकरी, महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि अमली पदार्थांच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला.
शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी राज्यात सुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याची भूमिका मांडली. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर “५६ टक्के कमिशन सरकार” असल्याचा आरोप करत कंत्राटदारांची एक लाख कोटी रुपयांहून अधिक बिले प्रलंबित असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत महिला अत्याचार आणि अमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांवर सरकारला धारेवर धरले. तर जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांच्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सरकार टिंगल-टवाळी करत असल्याची टीका केली.
जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार नसल्याने चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने बहिष्काराचा निर्णय घेतला. पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविणार असल्याचा इशाराही आघाडीच्या नेत्यांनी दिला.