मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि प्रखर सामाजिक जाणिवा जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नानांचे निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठीही मोठा धक्का असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
“गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील नानांच्या घरी गणपती दर्शनासाठी झालेली भेट हीच आमची शेवटची भेट ठरली,” अशा शब्दांत शिंदे यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “नाना पाटेकर हे अभिनयाची एक जिवंत शाळा होते. ‘नटसम्राट’मधील त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या कानात घुमतात. पडद्यावर ते जितके भारदस्त आणि प्रभावी होते, तितकेच प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत साधे, मनमिळाऊ आणि जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्त्व होते.”
नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी केलेले सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. सामान्य माणसाशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दलची त्यांची तळमळ आणि मदतीसाठी केलेले कार्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
नानांसोबतच्या वैयक्तिक आठवणी सांगताना शिंदे म्हणाले, “पुण्यातील त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मी दरवर्षी जायचो. नानांचे आदरातिथ्य आणि त्यांचा मनमिळाऊ स्वभाव जवळून अनुभवता आला. त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे हा नेहमीच सुखद अनुभव राहिला.”
“आमच्या दरे येथील निवासस्थानीही नानांनी भेट दिली होती. त्यांनी शेतीची पाहणी केली होती आणि गाळ उपसण्याच्या कामासाठीही ते आले होते. खासगी भेटीत माझ्या पाठीवर हात ठेवून त्यांनी ‘काय क्रांतिवीर…’ अशी दिलेली साद आणि कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या त्या शब्दांनी जनतेसाठी अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली,” असे शिंदे यांनी सांगितले.
आपल्या कलेचा उपयोग समाजासाठी करणारे नाना पाटेकर हे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दमदार अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. ‘नटसम्राट’सारख्या भूमिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. अभिनयातील सहजता, आवाजातील ताकद आणि प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे झोकून देण्याची त्यांची वृत्ती कायम स्मरणात राहील.
“नाना पाटेकर हे केवळ उत्तम अभिनेते नव्हते, तर कलेच्या माध्यमातून समाजाशी नाते जोडणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी अभिनय आणि सामाजिक कार्यातून निर्माण केलेले स्थान कायम राहील,” असे शिंदे म्हणाले.
“महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्यासारखा अभिनेता शतकातून एकदाच जन्माला येतो,” अशा शब्दांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचे नाना पाटेकर यांचे अखेरचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे आपले कर्तव्य समजतो, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. “नानांचे हे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी सांगितले.नाना पाटेकर यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.