मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून सहभागी झालेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळविले, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदकाचा मान मिळविला. या यशाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी श्रद्धासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील ३५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत विज्ञानाधारित प्रकल्प सादर केले. देशभरातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रकल्पांचे नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, वापरण्यातील सुलभता आणि दैनंदिन जीवनातील उपयोजन या निकषांवर उत्कृष्ट ६० प्रकल्पांची ‘सुपर ६०’ गटासाठी निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चांदगाव येथील विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ या प्रोटोटाइपच्या माध्यमातून देशात प्रथम क्रमांक मिळविला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत करण्याची संकल्पना या प्रकल्पात मांडण्यात आली आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते श्रद्धाला सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले.
‘सुपर ६०’मध्ये निवड झालेल्या महाराष्ट्रातील अन्य सहा विद्यार्थ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद स्कूल, लक्ष्मीवाडीचा राजवर्धन प्रदीप काळे; पुण्यातील एम. ई. एस. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची देविका सुहास ताड; सिटी प्राइड स्कूलचा अर्णव भुसारी; डी. ई. एस. माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची गीता गणपत धनवडे; सोलापूर जिल्ह्यातील के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोटची शांभवी रामनप्पा अजगुंडे आणि वाशिम येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विराज संदीप शिंदे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि संबंधित शाळांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा आणि कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.
राज्य शासनाने ‘विद्यार्थी विज्ञान वारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून नासाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्य विज्ञान शिक्षण संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेतील ‘सुपर ६०’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत जपान भेटीची संधीही उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.