मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत सादर केली. या उपक्रमात दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर सात लाख शिक्षकांनीही मार्गदर्शन केले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या माहितीप्रमाणे, या उपक्रमाची अधिकृत नोंद World Book of Records, London या आंतरराष्ट्रीय संस्थेत झाली असून यामुळे विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. यासोबतच, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्याकडूनही स्वतंत्र विश्वविक्रमांची नोंद झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी १४ मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडीओ उपलब्ध करून दिला.
दादाजी भुसे म्हणाले, “’राष्ट्र प्रथम’ हा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा आणि त्यांच्यामध्ये प्रखर देशभक्ती, शिस्त व एकात्मतेची भावना बळकट व्हावी, यासाठी हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम सर्व शाळांमध्ये चालू राहणार आहे.”उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.राज्यव्यापी यशासाठी शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षक, पालक आणि नागरिक यांनी सहकार्य केले.