अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बाळांना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, नवजात शिशू अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यावेळी विभागात ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत दाखल असलेल्या बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धावपळ केली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागली त्यावेळी संबंधित अतिदक्षता विभागात एकूण नऊ नवजात बाळांवर उपचार सुरू होते. त्यापैकी सहा बाळांना कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढले; मात्र तीन बाळांचा या आगीत मृत्यू झाला.
जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशू अतिदक्षतेचे तीन स्वतंत्र कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात १३ बाळांवर उपचार करण्याची क्षमता असून, एकूण ३९ नवजात बालकांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. यापैकी एका कक्षात ही भीषण दुर्घटना घडली.
घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आग नेमकी कशामुळे लागली, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का, याबाबत तपास सुरू आहे.