जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

महाराष्ट्र

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना

जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही काळ तिच्या कुटुंबीयांची धावपळ उडाली होती. मात्र जेजुरी पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतेमुळे या घटनेचा सुखद शेवट झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील भाविकांचा एक गट श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आला होता. त्यांच्यासोबत तीन वर्षांची स्वरांशी प्रभाकर गायके ही चिमुकलीदेखील होती. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण गडावरून खाली आले आणि घाईगडबडीत टेम्पोने पुढील दर्शनासाठी आळंदीकडे रवाना झाले.

आळंदी येथे पोहोचल्यानंतर स्वरांशी सोबत नसल्याचे लक्षात येताच आजी राहीबाई सुदाम गायके (वय ५५), आजोबा सुदाम अण्णा गायके (वय ६०) आणि इतर भाविकांच्या चिंतेत भर पडली. टेम्पो चालकांनी तातडीने जेजुरीतील परिचित सुरज चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मुलीचे छायाचित्र व माहिती पाठवली. सुरज चव्हाण यांनी त्वरित जेजुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.

दरम्यान, सोनवणे पार्किंग परिसरातील एका रसवंतीगृहाजवळ ही चिमुकली आढळून आली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यापूर्वी श्री मार्तंड देव संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र प्रतिसाद मिळाला नव्हता.

माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी मुलीला सुरक्षित ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पोलीस हवालदार निता दोरके यांनी स्वरांशीची आईच्या मायेने काळजी घेत तिला जेवण दिले, खेळवले आणि धीर दिला. पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तिची विशेष काळजी घेतली.

अखेर रात्री उशिरा आळंदीहून आजी-आजोबा जेजुरी पोलीस ठाण्यात पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजता स्वरांशी आपल्या कुटुंबीयांच्या कुशीत परतली आणि उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

जेजुरी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनीही या प्रकरणात विशेष लक्ष घालून आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस कर्मचारी प्रसाद कोळेकर, योगेश चितारे, निता दोरके, उदय पवार, ठाणे अंमलदार तात्यासाहेब खाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश झगडे उपस्थित होते.

या घटनेत जेजुरी पोलिसांनी केवळ आपले कर्तव्यच बजावले नाही, तर मानवतेचेही दर्शन घडवले. हरवलेल्या चिमुकलीला सुरक्षित ठेवून तिची योग्य काळजी घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याची ही घटना जेजुरी पोलिसांच्या जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारी ठरली आहे.”कायद्याचे रक्षण करताना माणुसकीही जपणारे जेजुरी पोलीस” अशी भावना या घटनेनंतर नागरिकांतून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत