इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एन. डी. स्टुडिओची दमदार एन्ट्री; विदेशी चित्रकर्मींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र

वेव्हज् फिल्म बझारमध्ये प्रथमच स्वतंत्र दालन; कोल्हापूर चित्रनगरीलाही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी

गोवा: गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीची ताकद आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होत आहे. वेव्हज् फिल्म बझारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने एन. डी. स्टुडिओचे (एनडीज् आर्ट वर्ल्ड) स्वतंत्र विशेष दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला देश-विदेशातील चित्रपट निर्माते, कार्यकारी निर्माते, चित्रकर्मी, माध्यम प्रतिनिधी आणि सिनेरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एन. डी. स्टुडिओचा कलात्मक वारसा, चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा आणि व्यावसायिक सहकार्याच्या संधींमुळे या दालनाने महोत्सवात विशेष लक्ष वेधले आहे.

मराठी चित्रपटसृष्टी, महाराष्ट्रातील चित्रीकरण सुविधा तसेच महामंडळाच्या विविध योजना आणि उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महामंडळ २०१५ पासून इफ्फीमध्ये सहभागी होत आहे. यंदा महामंडळाच्या दालनासोबतच एन. डी. स्टुडिओचे स्वतंत्र दालन प्रथमच उभारण्यात आले आहे. दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एनडीज् आर्ट वर्ल्डचे संचालन २०२४-२५ पासून महामंडळाकडून करण्यात येत आहे.

भव्य सेट्स, आकर्षक कलाकुसर आणि चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांमुळे एन. डी. स्टुडिओने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी ५० टक्के सवलतीची योजना राबविण्यात येत आहे. याशिवाय चित्रपट पर्यटन, विविध समारंभांचे आयोजन आणि चित्रीकरणपूरक पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर दिला जात आहे.

वेव्हज् फिल्म बझारमध्ये डॉ. सुमित पाटील यांच्या कलादिग्दर्शनाखाली आणि हेमंत भाटकर यांच्या सहकार्याने हे विशेष दालन साकारण्यात आले. महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले. एन. डी. स्टुडिओशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करताना, ‘हा स्टुडिओ माझे होमग्राउंड आहे,’ अशी भावना गोवारीकर यांनी व्यक्त केली. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या दालनातून केवळ स्टुडिओतील सुविधांची माहिती न देता चित्रपट निर्मिती, प्रशिक्षण, चित्रीकरण आणि चित्रपट पर्यटन क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींबाबतही अभ्यागतांशी संवाद साधण्यात येत आहे. अमेरिका, स्पेन, कझाकिस्तान, दुबई आणि हाँगकाँग येथील कार्यकारी निर्मात्यांसह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी दालनाला भेट दिली. ऑस्कर अकादमीचे भारतीय प्रतिनिधी उज्ज्वल निरगुडकर यांनीही भेट देत महामंडळ आणि एन. डी. स्टुडिओच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनीही दालनाला भेट दिली. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्फीतील सहभागाचे नियोजन करण्यात आले. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्त व प्रशासकीय अधिकारी चित्रलेखा खातू यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपअभियंता विजय बापट, सहाय्यक लेखा अधिकारी महेश भांगरे, विपणन अधिकारी सोनाली जकातदार आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.

‘इफ्फी’त कोल्हापूर चित्रनगरीचेही स्वतंत्र दालन

दरम्यान, यंदाच्या इफ्फीमध्ये कोल्हापूर चित्रनगरीनेही प्रथमच सहभाग नोंदवला आहे. वेव्हज् फिल्म बझार विभागात कोल्हापूर चित्रनगरीचे स्वतंत्र विशेष दालन उभारण्यात आले असून, त्यातून चित्रनगरीचा समृद्ध वारसा, उपलब्ध सेवा-सुविधा आणि आजवर चित्रीत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती देश-विदेशातील अभ्यागतांना दिली जात आहे.

या दालनालाही आंतरराष्ट्रीय चित्रकर्मी, सिनेरसिक आणि माध्यम प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी दालनाला भेट देत कोल्हापूर चित्रनगरीच्या सुविधांविषयी आणि भविष्यातील चित्रीकरणाच्या संधींविषयी माहिती घेतली. यावेळी कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सावंत, समीक्षा भोसले आणि चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीची क्षमता, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांना जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरीचा इफ्फीमधील सहभाग महत्त्वपूर्ण ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत