अमित शाहांच्या उपस्थितीत १,५०० कोटींच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन
पुणे : तब्बल ११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडला आता नवसंजीवनी मिळणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या संस्थेच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात येत असून, यामुळे हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याच कार्यक्रमात चालकांनाच मालक बनविणाऱ्या ‘भारत टॅक्सी’ या सहकारी उपक्रमाच्या पुण्यातील सेवेचे उद्घाटनही करण्यात आले. सहकार क्षेत्रात अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आमूलाग्र परिवर्तन होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माधुरी मिसाळ, आशिष कुमार, पंकजकुमार बन्सल यांच्यासह खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून अमित शाह यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपविल्यानंतर सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. सहकारातील मक्तेदारी आणि अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालून योजनांचे लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. साखर उद्योगाच्या अडचणी सोडविताना १० हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकराचा प्रश्न मार्गी लावून कारखान्यांना मोठा दिलासा देण्यात आला. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांच्या योगदानाचीही आठवण काढली.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा पुनर्निर्माण प्रकल्प हा केवळ एका कारखान्याचे पुनरुज्जीवन नसून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनांना बळ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सुमारे ११० एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात साखर उद्योग, डेअरी, इथेनॉल, बायोगॅस आणि जैवआधारित उद्योगांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचीही साथ लाभणार आहे. या प्रकल्पामुळे स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच कुशल मनुष्यबळ आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल. पूर्वीच्या भ्रष्टाचारामुळे बंद पडलेल्या सहकारी संस्था पुन्हा उभ्या करणे ही काळाची गरज असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
अमित शाह यांनी कोल्हापूरमध्ये दिलेला शब्द पाळत या प्रकल्पासाठी १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संवेदनशीलता दाखवून उपाययोजनांची विचारपूस केली. तसेच गडचिरोलीतील नक्षलवाद निर्मूलनासाठी सुरू असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले, असे शिंदे यांनी सांगितले.
‘भारत टॅक्सी’ हा सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रम असून, या माध्यमातून टॅक्सीचालकच मालक बनणार आहेत. मध्यस्थ आणि कमिशनची व्यवस्था संपुष्टात येऊन चालकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला थेट मिळणार आहे. ‘सारथी दीदी’सारख्या उपक्रमांतून महिलांनाही टॅक्सी व्यवसायात संधी उपलब्ध होणार असून, लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, यूपीए सरकारच्या १२ वर्षांच्या काळात राज्याला सुमारे २ लाख कोटी रुपये मिळाले, तर एनडीए सरकारच्या १२ वर्षांत सुमारे १५ लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे ठामपणे मागणी केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन असून उद्योग, स्टार्टअप आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. मात्र, काहींना मोदी फोबिया आणि अमित शाह यांच्या नावाचाही फोबिया असल्याने विकासकामांवर टीका केली जाते. चांगल्या कामाचे स्वागत करण्याची वृत्ती असली पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या पुनर्निर्माण प्रकल्पामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल. उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती, स्वदेशी उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.