मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार घेतला आहे. शरद पवार यांच्यावरील टीका ही अर्धसत्यावर आधारित असून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
“शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना किती वेळा हमीभाव मिळाला?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या नवनाथ बन यांनी प्रथम सध्याच्या सरकारकडे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयांबाबत प्रश्न विचारावेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. कांद्याचे दर कोसळून शेतकरी अडचणीत सापडला असताना सरकारची भूमिका काय होती, असा सवालही पक्षाने उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नेतृत्वावर टीका करणे सोपे असले तरी कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कणखर नेतृत्व आवश्यक असते, असे पक्षाने म्हटले आहे. शरद पवार यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान देशातील शेतकरी विसरू शकणार नाहीत, असा दावाही करण्यात आला आहे.
नवनाथ बन यांना खरोखरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता असेल, तर त्यांनी उत्पादन खर्चातील वाढ, निर्यात धोरणातील त्रुटी, साठवणूक व्यवस्थेचा अभाव आणि बाजारभावातील अस्थिरता यांसारख्या प्रश्नांवरही ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.
शेतकरी हा राजकीय टोलेबाजीचा विषय नसून देशाचा अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदनांचा वापर स्वस्त राजकारणासाठी करू नये. तथ्यांवर आधारित चर्चा करण्याची तयारी असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेसाठी सदैव तयार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.