इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली असून, आता सहावीचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, तसेच एससीईआरटीचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांसह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवीन अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित आणि काठिण्यपातळी लक्षात घेऊन आराखडा निश्चित करण्यात आला आहे. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी, चौथीसोबतच सहावीचाही हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.

दरम्यान, या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके ‘बालभारती’कडून तातडीने तयार केली जाणार असून, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपर्यंत ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय आणि त्यानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत