महापरिनिर्वाण दिनी ‘कामगार आयुक्तालयातर्फे’ कामगारांकरीताच्या विविध योजना जनजागृती

महाराष्ट्र

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांच्यातर्फे कामगारांकरीता विविध योजनांबाबत जनजागृती मोहिम अंतर्गत माहीती उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती पत्रकांचे वाटप व कामगार विभागातील विविध योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.

स्टॉलला भेट देणाऱ्या कामगारांना कामगार आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समजावून सांगितल्या. या बरोबरच समाजात बाल कामगार प्रथा निर्मूलनाबाबत बालमजूरी प्रथेविरुध्द जनजागृती होण्यासाठी प्रबोधन व्हावे, याकरीता रॅली काढण्यात येऊन पत्रके वाटून बालमजूरी प्रथेविरुध्द भावना व्यक्त व्हावी अशा आशयाचा सेल्फी स्टँड उभारण्यात आला होता. असंघटीत कामगारांकरीता असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी विमा योजनेच्या पत्रकांचे सुध्दा वाटप करण्यात आले. या स्टॉलला भेट देण्याऱ्या हजारो कामगारांची ई-श्रमची मोफत नोंदणी करुन देण्यात येत होती. कामगारांनी तसेच विविध क्षेत्रातील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या स्टॉलला भेट देऊन या उपक्रमाची स्तुती केली.

डॉ. एच.पी. तुम्मोड, भा.प्र.से., मा.कामगार आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शिरीन लोखंडे, सह आयुक्त (कामगार) व श्री. बाळासाहेब वाघ, प्र. अपर कामगार आयुक्त, कोकण विभाग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर उपक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री. प्रविण कावळे, सहायक कामगार आयुक्त व विकास रोकडे, दुकाने निरीक्षक यांनी पार पाडली. सदर स्टॉलला कामगार विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी भेटी देऊन या उपक्रमाबद्दल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.