येत्या रविवारी, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शिव प्रथमच शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळेच महाशिवरात्रीला शिवलिंगावर विशेष अभिषेक करण्याचे महत्त्व आहे.
असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे शिवलिंगाचा अभिषेक केल्यास जीवनातील दुःख दूर होतात, ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. याचबरोबर, या दिवशी शिवमंदिरातून काही पवित्र वस्तू घरी आणल्यास पैशाची कमतरता कधीच भासत नाही, अशीही श्रद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
महाशिवरात्रीला या वस्तूंनी करा शिवलिंगाचा अभिषेक
पाणी
भगवान शिवांना पाणी अतिशय प्रिय आहे. एक तांब्या स्वच्छ पाणी अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अभिषेकाची सुरुवात पाण्याने करावी.
दूध
पाण्यानंतर थोडेसे दूध शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे जीवनात आर्थिक स्थैर्य येते, असे मानले जाते.
दही
दह्याचा अभिषेक केल्याने मानसिक ताण कमी होतो. दह्याचा थंडावा भगवान शिवांना शांत करतो आणि समस्या दूर होतात.
मध
शिवलिंगावर मध अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात सुख-समाधान मिळते तसेच आजारांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.
तूप
मुलांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर तुपाचा अभिषेक करावा.
काळे तीळ
काळ्या तीळाने अभिषेक केल्याने वाईट नजर, नकारात्मक शक्ती आणि तांत्रिक अडथळे दूर होतात, असे मानले जाते.यानंतर पार्वती माता आणि भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा करावी.
महाशिवरात्रीला मंदिरातून ‘या’ वस्तू घरी नक्की आणा
बेलपत्र
शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणणे शुभ मानले जाते. हे बेलपत्र तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवल्यास पैशाचा ओघ कायम राहतो, अशी श्रद्धा आहे.
पार्वती मातेला अर्पण केलेल्या वस्तू
पार्वती मातेला अर्पण केलेल्या बांगड्या, चोळी किंवा सिंदूर घरी आणून परिधान केल्यास अखंड सौभाग्य, पतीला दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते, असे मानले जाते.
अभिषेकाचे पाणी
अभिषेकावेळी भगवान शिवाला अर्पण केलेले थोडेसे पाणी एका भांड्यात साठवून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. आजारी व्यक्तीवर हे पाणी शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.