अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापलं; संजय राऊत–रोहित पवारांवर भाजपाचा हल्लाबोल

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर “प्रसिद्धी स्टंट” केल्याचा आरोप करत प्रखर टीका केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात बोलताना बन म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर काही नेते रोज उठून तेच मुद्दे मांडत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार गंभीरपणे प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच डीजीसीए स्तरावर चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशीच्या मागणीवरही सकारात्मक विचार सुरू आहे.”

‘महायुतीत होते, ते विसरू नका’

राऊतांनी “अजितदादांची महाविकास आघाडीत येण्याची इच्छा होती” असा दावा केल्याबाबत बन यांनी पलटवार केला. “अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली, उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि एनडीएमध्ये सामील झाले होते. हे भान ठेवावे,” असे ते म्हणाले. “बाष्कळ दावे करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगिरी बंद करून वेब सीरीजचे लेखन करावे,” असा टोमणाही त्यांनी लगावला.

ब्लॅक बॉक्स सुरक्षित; थोडा वेळ द्या

अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती देत बन म्हणाले, “त्यातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा.” रोहित पवारांनी हा मुद्दा राज्यसभेत उचलण्यासाठी राऊतांचा पुढाकार घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी सवाल केला, “शरद पवार गटाचे खासदार लोकसभा-राज्यसभेत असताना त्यांच्या माध्यमातून मुद्दा का मांडला गेला नाही?”

‘एफआयआर नव्हे, अपघाती मृत्यू अहवाल’

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीवरूनही बन यांनी रोहित पवारांवर टीका केली. “अपघातानंतर एफआयआर नव्हे, तर अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला जातो. तो यापूर्वीच दाखल झाला आहे. चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत, तरीही प्रसिद्धीसाठी उतावळेपणा केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात वातावरण तापले असून, अपघाताच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.