५० लाखांच्या वादातून कट, ४० दिवसांनी गुन्हा उघड
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख (HOD) राजाभाऊ लोंढे यांच्या हत्येचा थरार तब्बल ४० दिवसांनी उघडकीस आला आहे. ५० लाखांच्या पैशांच्या वादातून आरोपींनी त्यांच्याच परवानाधारक पिस्तुलाने गोळी झाडून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल विकास राठोड या इव्हेंट मॅनेजरने लोंढे यांना ‘Love and Dare’ नावाचा रिॲलिटी शो सुरू करण्याचे आमिष दाखवत सुमारे ५० लाख रुपये घेतले होते. मात्र हा शो कधीच सुरू झाला नाही. त्यामुळे लोंढे यांनी पैसे परत मागण्यासाठी आरोपींकडे वारंवार तगादा लावला होता.
५ फेब्रुवारी रोजी दौलताबाद परिसरातील एका फार्महाऊसवर पार्टी करून परतत असताना गाडीत पैशांवरून वाद झाला. त्यावेळी आरोपींनी लोंढे यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल हिसकावून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आधीच आखलेला कट राबवण्यात आला.
मृतदेह पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
आरोपींनी गेवराई तांडा परिसरात तीन दिवस आधीच जेसीबीच्या सहाय्याने दोन खड्डे खोदून ठेवले होते. खून केल्यानंतर मृतदेह रात्रभर कारमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यांपैकी एका खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘त्या’ व्हॉट्सॲप स्टेटसने संशय वाढला
खुनानंतर आरोपींनी लोंढे यांचा मोबाईल पुण्यात नेऊन लक्ष्मी रोड परिसरात सुरू केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरून “I am in personal work, don’t call anyone” असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्यात आले.
मात्र लोंढे हे सुशिक्षित प्राध्यापक असल्याने असे चुकीचे इंग्रजी स्टेटस त्यांनी ठेवणे शक्य नसल्याचा संशय पोलिसांना आला. याच धाग्यावरून गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि अखेर आरोपींना अटक करण्यात यश आले.
अटक केलेले आरोपी
१. विशाल विकास राठोड (२४) – मुख्य सूत्रधार
२. आकाश विनोद पवार (३२)
३. करण विलास आडे (२२)
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.