वॉटरग्रेस कंपनीला जैविक कचरा जमा करण्याची दिलेली मुदतवाढ रद्द करा; अंबादास दानवे

महाराष्ट्र

नागपूर: छत्रपती संभाजीनगर येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्यासाठी नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनी ला गेल्या २० वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देऊन तिला मुदतवाढ दिलेली आहे, ती रद्द करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषद सभागृहात केली.

तसेच तिथे अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. सदर एजन्सीचे काम हे संथगतीने सुरू असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसविल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे सदर कंपनीला दिलेली मुदतवाढ रद्द करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सदर एजन्सीच्या कामाच्या ठिकाणी पाहणी व तपासणी न करता क्लीनचिट दिली त्याबाबत उच्चस्तरिय चौकशी करावी, अशीही मागणी दानवे यांनी केली.

ही एजन्सी अनेकदा बायो मेडिकल वेस्ट पुन्हा वापरत असल्याच्या घटना उघडकीस आल्या असून तिच्या कामकाजाचा अनुभव शहरासाठी अत्यंत वाईट आहे.या संबंधित पुरावेही माझ्याकडे असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. सदरील विषयाप्रकरणी विभागीय आयुक्त मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.