मार्चमध्ये बँकांना सुट्ट्यांची मालिकाः काही ठिकाणी चार दिवस बँका बंद

महाराष्ट्र

मुंबई: मार्च २०२६ मध्ये बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील आठवड्यात विविध सण आणि सुट्ट्यांमुळे देशातील काही राज्यांमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला दिला जात आहे.

माहितीनुसार १७ मार्च, १९ मार्च, २० मार्च आणि २१ मार्च या दिवशी विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमध्ये धार्मिक सण, प्रादेशिक उत्सव तसेच विकेंडचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

१७ मार्च रोजी ‘शब-ए-कद्र’ या सणानिमित्त जम्मू आणि काश्मीरमधील बँका बंद राहतील. १९ मार्च रोजी महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू-काश्मीर, गोवा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये ‘गुढी पाडवा’, ‘उगादी’ आणि ‘तेलगू नववर्ष’ निमित्त बँकांना सुट्टी असेल.

२० मार्च रोजी जम्मू-काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये ईद सणामुळे बँकिंग व्यवहार होणार नाहीत. मात्र इतर राज्यांमध्ये त्या दिवशी बँका सुरू राहतील.

२१ मार्च रोजी आसाम, गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मेघालय आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ईदच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल. २२ मार्च रोजी विकेंड असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

याशिवाय २६ मार्च रोजी श्री रामनवमी निमित्त महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. २७ मार्च रोजी काही राज्यांमध्ये पुन्हा रामनवमीची सुट्टी राहणार आहे. २८ मार्च रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.

दरम्यान, ३१ मार्च रोजी महावीर जयंती निमित्त महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकिंग व्यवहाराचे नियोजन करूनच कामे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.