मुंबई: लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक माजी मंत्री व माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. यातून पक्ष सावरला नसतानाच आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे सांगतानाच राजकारणातून हळूहळू बाहेर पडणार असल्याची माहिती अरुणभाई यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
जळगावात गुरुवारी , दि 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, नेहमीच पक्षाच्या बैठकांना आवर्जून उपस्थित राहणारे अरुणभाई गुजराथी या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अरुणभाई गुजराथी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडल्यास ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याबाबत आता राजकीय गोटात उत्सुकता आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार की राष्ट्रवादी अजित पवार गटात ? याबाबत देखील चर्चा होती. मात्र, अरुणभाई राजकारणातून संन्यास घेत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. एक मोठा नेता सोबत नसल्यास शरद पवार गटाला चोपडा तालुक्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दोनच दिवसात दुसरा हादरा
याआधी, रावेरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांनी समर्थकांसह मंगळवार 9 सप्टेंबर रोजी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे आणि पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार अरुण पाटील यांनी 1995 आणि 2004 असे दोन वेळा भाजपमधून रावेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु 2009 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच जिल्ह्यात आणखी एक हादरा बसण्याची चिन्हं आहेत.