नवी दिल्ली : शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत इराण-इस्त्राईल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती तसेच महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. ‘एनडीए’चा मित्र पक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधानांच्या भूमिकेसोबत ठाम उभी असून देशासोबत आहोत, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करून राजकारण करणे हे देशविरोधी असल्याची टीका त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. “काहीजण पाकिस्तानात हेडलाईन्स मिळवण्यासाठी बोलतात,” असा टोला त्यांनी लगावला.
शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी देश प्रथम आणि नंतर राजकारण असायचे. त्याच विचारांवर आम्ही पुढे चाललो आहोत.” युद्धस्थितीत कुवेत, दुबई, मस्कत येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.
पंतप्रधान मोदी यांनी कोविडनंतर आखाती देशांशी निर्माण केलेल्या चांगल्या संबंधांमुळे होर्मुज सामुद्रधुनीतून भारताची दोन तेलवाहू जहाजे सुरक्षित परत आली, याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. राज्यातील विकासकामांवरही यावेळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, देशात गॅस टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले की, “काँग्रेस आणि उबाठा यांच्याकडून खोटा प्रचार केला जातोय. त्यामुळे काळाबाजाराला खतपाणी मिळत आहे.” राज्यात कुठेही गॅस सिलिंडरची टंचाई नसून सरकार सतर्कपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे बिनविरोध निवडून आल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी त्यांच्या सामाजिक जाणिवेचाही उल्लेख केला.या भेटीस शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर उपस्थित होते.
श्रीकांत शिंदेंच्या कामाचे कौतुक
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि पियूष गोयल उपस्थित होते. संसदीय कार्यमंत्री रिजीजू यांनी संसद भवनात शिंदे यांचे स्वागत करत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभेतील कामगिरीचे कौतुक केले. “श्रीकांत लहान भाऊ असून सभागृहात चांगले काम करत आहेत,” असे रिजीजू म्हणाले.