लोणीकंद हुंडाबळी प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश; डॉ. नीलम गोऱ्हेंची पोलिसांना सूचना

महाराष्ट्र

पुणे: पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात घडलेल्या विवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृत विवाहित महिला वैष्णवी यशवंत लाटे हिच्या कथित हुंडाबळीप्रकरणी आरोपींविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दि. १५ मार्च २०२६ रोजी या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत निष्पक्ष तपासाचे निर्देश दिले आहेत.

आपल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ व अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा आणि संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच मृत विवाहितेच्या कुटुंबाला आवश्यक ते संरक्षण व सहकार्य देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

तपासादरम्यान विवाहितेने कोणती चिठ्ठी लिहिली आहे का, तिचे शेवटचे फोन संभाषण काय होते, तसेच छळासंदर्भातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून पुरावे गोळा करावेत, असेही त्यांनी सुचविले. आधुनिक फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपास अधिक प्रभावीपणे करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

याशिवाय, हुंड्याच्या मागणीसंदर्भातील वस्तू जप्त करून त्यांचा तपासात समावेश करावा, तसेच तपास पूर्ण करून लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे आणि प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.