मुंबई: मालेगाव स्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हेत तर सनातनी दहशतवाद म्हणा, असं विधान केलं होतं. या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अशातच शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत असून शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान म्हणजे सनातन धर्माचा अपमा असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी, अशी मागणीही शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
न्यायालयाने मालेगाव स्फोटातील आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून चुकीची विधान केली जाते आहे. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. आम्ही हे कधीही सहन करणार नाही. आम्हाला त्यांना निवदेन द्यायचं आहे. त्यांनी माफी मागणी ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रियाही शिवसैनिकांकडून देण्यात आली.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते?
मालेगावचा बॉम्बस्फोट खटला १७ वर्ष हा चालला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं. आम्हाला हा निकाल अपेक्षित होता. कारण तपासातून आलेले प्रतिकूल पुरावे, होस्टाईल साक्षीदार यामुळे तपास अपुरा राहिला, असे मत पृथ्वाराज चव्हाण यांनी व्यक्त केले होतं.
पुढे बोलताना, आरडीएक्स बाजारात सहज मिळत नाही. एनआयए हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालते. या बॉम्बस्फोटात अनेक लोक जखमी झाले होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणीच दोषी नाही. मग स्फोट कोणी केला? असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण उपस्थित केला होता.
हा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा’ असे ट्वीट केले होते. त्यावरही बोलताना भगवा हा शब्द वापरू नका. भगवा हा आमच्यासाठी महत्त्वाचा रंग आहे. तो महाराजांचा ज्ञानेश्वरीचा रंग आहे. सनातनी दहशतवाद म्हणा. दहशतवादाला धर्म नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.