मालेगाव: मालेगाव स्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मोठा खुलासा केला आहे. शनिवारी जामिनाच्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्या सत्र न्यायालयात हजर झाल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तपास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, चौकशीदरम्यान त्यांना प्रचंड छळण्यात आले आणि जबरदस्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह अनेकांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. “त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जर मी ही नावे घेतली नाहीत, तर मला आणखी त्रास दिला जाईल. पण मी खोटं बोलू इच्छित नव्हते म्हणून मी कुणाचंही नाव घेतलं नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, प्रज्ञा ठाकूर यांच्या या दाव्यांचा उल्लेख एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या १०३६ पानी निकालात नाही. न्यायमूर्ती ए.के. लाहोटी यांनी आपल्या निर्णयात प्रज्ञा ठाकूर यांच्या छळवणुकीचे दावे फेटाळून लावले आहेत.
पत्रकारांशी बोलताना साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या, “ते मला रुग्णालयातही अवैधरीत्या ठेवून होते. मी बेशुद्ध झाले होते, माझे फुफ्फुसे खराब झाली. पण तरीही मला यातना दिल्या गेल्या.” त्यांनी पुढे सांगितले की या संपूर्ण अनुभवावर त्या पुस्तक लिहित आहेत, ज्यात सत्य जगासमोर मांडले जाईल.
“ही धर्माची विजयगाथा आहे, सनातन धर्माची आणि हिंदुत्वाची विजयगाथा आहे. आता आम्ही प्रयत्न करू की दोषींना शिक्षा मिळावी,” असे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी ठामपणे सांगितले.