मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवनियुक्त लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या विभागवार बैठकांचा धडाका उद्यापासून सुरू होणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाची दिशा देतानाच त्यांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
कोकण विभागाची पहिली बैठक बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील दादर येथील काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक पार पडणार आहे.
विशेष म्हणजे, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून नेमक्या कोणत्या कामांची अपेक्षा आहे, याबाबतची कार्यपद्धती (SOP) प्रत्येक प्रभारी आणि पदाधिकाऱ्याला पाठविण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पदनियुक्तीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून संघटन वाढविण्याची जबाबदारी आता पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.
तीन महिन्यांनी कामाचा हिशेब; निष्क्रिय प्रभारींची पदे धोक्यात?
या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक प्रभारीच्या कामाचा तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची समीक्षा करून त्यानुसार प्रभारींच्या यादीत फेरबदल केले जाणार आहेत. त्यामुळे संघटनात्मक कामात सक्रियता, कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष योगदान यांना महत्त्व मिळणार आहे.
काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील पक्षसंघटना नव्याने बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प या नेतृत्वाने केला असून, विभागवार बैठकांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असून, संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित केले जाणार आहे.