भोंदू बाबावर कडक कारवाई होणारच; आनंद परांजपे यांचा इशारा

महाराष्ट्र

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत विकास लवांडे यांच्यावर जोरदार टीका केली. “गांडुळासारखी वळवळ बंद करा,” असा थेट टोला लगावत त्यांनी महायुती सरकारकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केल्याचे परांजपे म्हणाले. गृहमंत्री म्हणून स्वतः फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचा उल्लेख करत, “निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे,” अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

विकास लवांडे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना परांजपे म्हणाले की, “पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप करणाऱ्या लवांडेंच्या वक्तव्यांमागे रोहित पवार यांचा प्रभाव आहे का?” अशी शंका उपस्थित होते. तसेच त्यांनी सुनील तटकरे यांना सह-आरोपी करण्याच्या मागणीवरही टीका केली.याचबरोबर त्यांनी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावरही प्रश्न उपस्थित करत, “त्या काळात ट्रस्टला पाणी कोणाच्या आदेशाने दिलं?” असा सवाल केला.

पक्ष नेतृत्वावर बोलताना परांजपे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेत होते आणि आता ती जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. “आमचा पक्ष ठाम नेतृत्वाखाली चालतो; पण तुमचा पक्ष नेमका कोण चालवतो?” असा सवाल करत त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचा उल्लेख केला.

सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांच्यासह ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी SIT कडे सादर करावेत. तसेच सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्नांवरही बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.शेवटी, “नुसता हवेत गोळीबार करू नका; ठोस पुरावे द्या. SIT मार्फत प्रत्येक बाबीची निष्पक्ष चौकशी होईल,” असे ठाम आवाहन परांजपे यांनी केले.