शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी ता. शिरूर येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत सरदवाडी, इन्हेलर इंडिया लिमिटेड व नोहाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या विषयावर भारुडाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात भारुड सम्राट ह. भ. प. अनिल महाराज सावळे (मुळशीकर) यांनी आपल्या खास शैलीतून घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व, स्वच्छतेची गरज आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याबाबत अत्यंत समर्पक मार्गदर्शन केले. त्यांच्या भारुडाने उपस्थित ग्रामस्थांचे प्रबोधन करतानाच मनोरंजनही केले, त्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गाव स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई घावटे, माजी सदस्य आबासाहेब सरोदे, कंपनीच्या व्यवस्थापक मेघा आगलावे, प्रकल्प व्यवस्थापक विजय भालेकर, उपसरपंच सोमनाथ सरोदे तसेच ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे, मोनाली कर्डिले, शिल्पा घावटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी गावडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मांडगे मॅडम, अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक खामकर सर, माजी सरपंच विलास कर्डिले, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील उत्कृष्ट सीपी (कंपोस्ट) प्लांटच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनात सहभाग वाढवण्यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक वॉर्डातून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
वॉर्ड क्रमांक १ मधून राजाराम विठ्ठल घावटे, मीरा पोपट सरोदे व प्रताप नानाभाऊ सरोदे, वॉर्ड क्रमांक २ मधून दत्तात्रय गंगाराम सरोदे, शालू सचिन सोनवणे व गजानन शिवाजी झिटे, तर वॉर्ड क्रमांक ३ मधून सुदाम धोंडीबा घावटे, राजाराम धोंडीबा घावटे व प्रशांत प्रभाकर धोत्रे हे विजेते ठरले.
या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ हा संदेश घराघरात पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे. ग्रामस्थांनीही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सरोदे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र जाधव यांनी मानले.