विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

महाराष्ट्र

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद, पारदर्शक व प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रस्तावित ‘Students Grievances Portal’ ची कार्यवाही तातडीने गतीमान करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘Students Grievances Portal’च्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना तक्रारींसाठी विविध कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तक्रार नोंदणीपासून ते अंतिम निवारणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

पोर्टलची रचना सुटसुटीत, विद्यार्थीपूरक आणि वापरण्यास सुलभ असावी. तक्रारींचे योग्य स्वरूपानुसार वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे वेळेत पाठविणे, प्रत्येक तक्रारीच्या निवारणाची जबाबदारी निश्चित करणे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पोर्टलचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबरोबरच तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी योग्य तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पोर्टलची वापरकर्ता-अनुकूल रचना असावी. तक्रारींच्या निवारण प्रक्रियेत अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक तातडीच्या उपाययोजना करून पोर्टलचे कामकाज प्रभावीपणे कार्यान्वित करावे, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

‘Students Grievances Portal’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होण्यासोबतच प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चितीला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करून अधिक सक्षम, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे पोर्टल महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत