अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे यांच्या खात्यांची तात्पुरती फेरवाटप; कारण काय?

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली काही महत्त्वाची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे.

कोणाकडे कोणते खाते?

पत्रानुसार पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:

सार्वजनिक बांधकाम विभाग – दादा भुसे

नगरविकास मंत्रालय – उदय सामंत

गृहनिर्माण विभाग – शंभुराज देसाई

ही तजवीज केवळ विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापुरती करण्यात आल्याची माहिती आहे.

काय आहे कारण?

अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांत—विधानसभा आणि विधानपरिषद—शिंदे यांच्या खात्यांशी संबंधित प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तरांचा ताण येऊ नये आणि कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचे समजते.विरोधकांकडून येणाऱ्या प्रश्नांना संबंधित खाते सांभाळणारे मंत्री उत्तर देणार आहेत.

अधिवेशनाची सुरुवात

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने आज, सोमवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहात करून देण्यात आला.

तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत शोक प्रस्ताव सादर करण्यात आला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांचे सदस्य या शोकप्रस्तावात सहभागी झाले.

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर प्रथमच हे अधिवेशन होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.