लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा

महाराष्ट्र

निवडणूक आचारसंहितेमुळे जानेवारीचा लाभ रखडला

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर २०२५ महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच हा निधी वितरित करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारकडून दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू असताना अग्रिम स्वरूपात लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केल्याने सरकारने केवळ डिसेंबर महिन्याचाच नियमित हप्ता वितरित केला आहे.

राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना, लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देण्यास परवानगी असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देता येणार नाही, तसेच नवीन लाभार्थ्यांची निवड करता येणार नाही, असे आदेश आयोगाने दिले आहेत. मुख्य सचिवांचा अहवाल आणि निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

विरोधकांच्या तक्रारीनंतर आयोगाची भूमिका

जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित केला जात आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आल्याने विरोधकांकडून त्यावर टीका करण्यात आली होती. यंदाही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा निधी एकत्र देण्याचा विचार होता. मात्र, काँग्रेस पक्षाने यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने सरकारकडे स्पष्टीकरण मागवले. त्यानुसार, सरकारने फक्त डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता वितरित केला असून जानेवारीचा अग्रिम हप्ता रोखण्यात आला आहे.

जानेवारीचा हप्ता कधी?

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा फेब्रुवारी महिन्यात हा निधी वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.