पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी अंतिम प्रभागाचा निकाल रात्री १० वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील १५ मतमोजणी केंद्रांवर ३३५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी ३८ टेबल टपाली मतदानासाठी तर २९७ टेबल ईव्हीएम मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत. चार-सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अनेक प्रभागांत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक प्रभागासाठी ४ ते १२ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. एका फेरीसाठी सरासरी ३५ ते ४५ मिनिटे लागणार आहेत.
प्रशासनाने एका वेळी एका प्रभागाचीच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित प्रभागाचा पूर्ण निकाल लागल्यानंतरच पुढील प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
सर्व मतमोजणी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि प्रवेश नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर कर्मचारी, निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गर्दी व कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता वाहतूक नियंत्रण आणि जमावबंदीचा विशेष आराखडा राबवण्यात येणार आहे.
आकडेवारी
एकूण प्रभाग : ४१
जागा : १६५
उमेदवार : १,१५५
टपाली मतदानासाठी वितरित मतपत्रिका : १२,०००
आतापर्यंत झालेले टपाली मतदान : २,८८९
प्रशासनाचा दावा
अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की,“मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या दोन तासांत पहिला निकाल येण्याची शक्यता आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असून, उमेदवार संख्या जास्त असलेल्या प्रभागांसाठी अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.”प्रशासनाचा प्रयत्न दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट करण्याचा असला, तरी पुणे महापालिकेचे अंतिम सत्ता समीकरण रात्री उशिराच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.