परिवर्तनवादी विचारांची दीपज्योत विझली; सामाजिक उपक्रमांतून ‘तेरवी’ला दिला मानवतावादी अर्थ

महाराष्ट्र

तिवसा: तिवसा तालुक्यातील संवेदनशील, अभ्यासू आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व असलेल्या निर्वाणस्थ लीलादेवी माणिकराव माहोरे (वय ६२) यांचे मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माहोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी जपलेले विचार आणि संस्कार समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

त्या “दरारा” साप्ताहिकाचे संपादक प्रवीण उर्फ राज माहोरे यांच्या मातोश्री होत, तसेच ज्येष्ठ पत्रकार माणिकराव माहोरे यांच्या सहचारिणी होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लीलादेवी माहोरे या केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नव्हत्या, तर बुद्ध–फुले–आंबेडकर विचारसरणीतून घडलेल्या एक जागरूक, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांचे आयुष्य संघर्ष, त्याग, करुणा आणि समाजसेवेच्या मूल्यांनी उजळलेले होते. त्यांच्या वर्तनातून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश सतत प्रकट होत असे.

त्यांच्या निधनानंतर माहोरे कुटुंबाने पारंपरिक ‘तेरवी’ विधी टाळून समाजोपयोगी कार्यातूनच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. दुःखाच्या क्षणातही समाजासाठी काहीतरी देण्याची ही भावना त्यांच्या विचारांची खरी ओळख करून देते.

स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक उपक्रमांची प्रभावी मालिका राबविण्यात येत आहे. यामध्ये भजन, देहदान संकल्प, रक्तदान, अनाथ मुलांच्या संस्थेत भोजनदान, वृद्धाश्रमात फळवाटप, बुद्ध विहारास वॉटर कूलर भेट, जखमी पशूंवर उपचार करणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत अशा उपक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिरे, हृदयरोग निदान, रक्तगट व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतमय स्वरांजली कार्यक्रमातूनही त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे.

या उपक्रमांमुळे तिवसा तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, “श्रद्धांजली म्हणजे केवळ विधी नव्हे, तर समाजासाठी केलेले कार्य” हा संदेश ठळकपणे समोर आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमांचे कौतुक करत हा उपक्रम समाजाला दिशा देणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

लीलादेवी माहोरे यांच्या जाण्याने एक ममत्वपूर्ण आई, कुटुंबवत्सल स्त्री आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले असले, तरी त्यांनी दिलेले संस्कार आणि विचारांचा वारसा त्यांच्या कुटुंबाच्या कार्यातून जिवंत राहणार आहे.

आज त्यांच्या आठवणींनी डोळे पाणावतात; पण त्यांच्या विचारांनी मनाला नवी दिशा मिळते. त्यांनी दाखवलेला मार्ग हा समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.

माणूस जातो, पण त्याचे विचार आणि कार्य अमर राहतात

आमच्या लीलादेवी माहोरे यांची स्मृती समाजसेवेच्या रूपाने सदैव जिवंत राहील.”