पुणे: वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेतील उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून प्रेक्षकांची दाद मिळवली. अंतिम लढत अत्यंत चुरशीची आणि थरारक ठरली. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सदगीर यांनी सरशी साधत मानाची गदा आपल्या नावावर केली.
या अंतिम झुंजीने कुस्ती परंपरेची उंची अधिक वाढवली असल्याचे गौरवोद्गार सुनेत्रा अजित पवार यांनी काढले. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक आणि रांगडा क्रीडाप्रकार असून, या परंपरेतूनच खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. आजचे तरुण पैलवान ही परंपरा पुढे नेत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेदरम्यान अनेक रोमांचक सामने रंगले आणि उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धेला विशेष उठाव मिळाला. यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी विजेते व उपविजेते खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.