गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून धर्मांतर करणाऱ्या नराधमाला पक्षातून तातडीने हाकला

महाराष्ट्र

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी असलेल्या शंतूने कुकडे याच्यावर धर्मांतराबाबतचे गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत. गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून धर्मांतर करणाऱ्या नराधमाला पक्षातून तातडीने हाकला, अशी मागणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धंगेकारांनी केली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, “शंतूने कुकडे नावाच्या एकाने नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर या व्यक्तीबद्दल यापूर्वी माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही सबळ पुराव्यांची जुळवाजुळव करत होतो. हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात राबवत असल्याचे पुढं येत आहे”.

‘गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते. काही गरजू कुटुंबातील महिला व मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडून केले जातात. तसेच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्यापर्यंतचा उद्योग नराधम करतो. समर्थ पोलिस ठाण्याकडे याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील, त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे’, असा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

धंगेकर पुढे म्हणाले, ‘या शंतूने कुकडेकडून मिळणाऱ्या मलईमुळे संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी आजवर त्याला सांभाळून घेतात. या प्रकरणात देखील मुसा, मुनीर, प्रतीक, सागर, जैन व पूनम आदी नामक व्यक्तींचा सहभाग असून हा तपास अतिशय थंड गतीने व चुकीच्या दिशेने सुरू आहे’. पोलिस प्रशासनाला विनंती करताना, धंगेकर यांनी आपण या सगळ्या प्रकरणाची ‘सीआयडी’ चौकशी करावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबियांची अशा प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा धंगेकर यांनी दिला. या नराधमाच्या बँक खात्यांची चौकशी केली असता, देशाबाहेरील ट्रस्टकडून कोट्यवधी रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याचे देखील माहिती मिळाली आहे, अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली. हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का? कोणी यावं पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे? पुणे शहरात यापुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत असे सांगताना उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून देखील आंदोलन करण्यात आले आहे . ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी याबाबत सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. पुढे हे प्रकरण चिघळणार असेच दिसते आहे.