इन्स्टाग्रामवरील प्रेमकहाणीचा भीषण शेवट

महाराष्ट्र

गोंदियाच्या तरुणीचा पतीकडून खून, मृतदेह पेटीत टाकून पाण्याच्या टाकीत फेकला

भोपाळ: व्हेलेंटाईन वीक सुरू असतानाच प्रेमसंबंधाचा थरकाप उडवणारा शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, लग्नही झाले; मात्र या नात्याचा शेवट खुनाने झाला. गोंदिया येथील एका ३३ वर्षीय तरुणीची तिच्याच पतीने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना भोपाळ येथे १२ फेब्रुवारी रोजी समोर आली.

इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली जीवघेणी

मूळची गोंदियाची असलेली अशरफी ऊर्फ सिया (३३) ही सोशल मीडियावर सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. याच माध्यमातून तिची ओळख भोपाळमधील समीर नावाच्या रिक्षाचालकाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि संसाराची स्वप्ने पाहत सियाने घर सोडून भोपाळ गाठले. तिथे दोघांनी लग्न केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

समीरचे तिसरे लग्न; घरगुती वादातून टोकाचे पाऊल

तपासादरम्यान समीरचे हे तिसरे लग्न असल्याचे स्पष्ट झाले. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबत राहत होती. सियाला घरी आणल्यानंतर समीरने सुरुवातीला ती आपली मेहुणी असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. मात्र, नंतर त्यांच्या लग्नाचे सत्य उघड झाले.

एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून घरात सतत वाद होत होते. या वादाला कंटाळून समीरची दुसरी पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेल्याची माहिती आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तीन दिवसांपूर्वी समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून खून केला.

मृतदेह लोखंडी पेटीत कोंबून पाण्याच्या टाकीत फेकला

पुरावा नष्ट करण्यासाठी समीरने दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळालेली पत्र्याची पेटी वापरली. त्यात सियाचा मृतदेह कोंबून घराशेजारील पाण्याच्या टाकीत ती पेटी फेकून दिली. १२ फेब्रुवारी रोजी परिसरातील नागरिकांना पाण्याच्या टाकीत संशयास्पद लोखंडी पेटी आढळली. पोलिसांनी पेटी उघडली असता त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

मृतदेहाच्या हातावर ‘दीप’ असे टॅटू आणि जन्मतारीख कोरलेली होती. या खुणांच्या आधारे मृतदेहाची ओळख सिया म्हणून पटवण्यात आली. मृतदेह तीन-चार दिवस जुना असल्याचे सांगितले जात असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

खून करून दुसऱ्या पत्नीसाठी जबलपूरला रवाना

धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर समीर अत्यंत निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूर येथे गेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.या घटनेने गोंदिया आणि भोपाळ परिसरात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून जुळलेल्या नात्यांचा असा भीषण शेवट झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.