बेंगळुरू: शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ शुक्रवारी (ता. १३) पहाटे भीषण साखळी अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारीने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
पहाटे सुमारे चारच्या सुमारास शहरातील बारावीचे सहा विद्यार्थी ‘लाँग ड्राइव्ह’साठी मोटारीतून निघाले होते. नवीन महामार्गावरून वेगात जात असताना त्यांनी प्रथम गगन (वय २६) या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटून मोटार दुभाजक ओलांडत समोरून येणाऱ्या कॅन्टरला समोरासमोर जाऊन धडकली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की मोटारीतील सर्व एअरबॅग्ज उघडल्या; मात्र अतिवेगामुळे प्रवाशांचे प्राण वाचू शकले नाहीत. अपघातानंतर कॅन्टर उलटला आणि त्याची मागील दोन चाके वेगळी झाली. त्याचवेळी मागून येणाऱ्या आणखी एका मोटारीने रस्त्यावर पडलेल्या कॅन्टरच्या चाकांना धडक दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.
कामावरून घरी जात असताना दुचाकीस्वाराचा मृत्यू
या अपघातात गगन (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला. तो सॅफल कंपनीत कार्यरत होता आणि आपल्या दृष्टिहीन आईचा एकमेव आधार होता. काम आटोपून घरी परतत असताना त्याच्यावर ही दुर्घटना ओढवली.
मृत विद्यार्थ्यांची माहिती
मोटारमधील मृतांमध्ये अश्विन नायर (वय १७) हा यलहंका येथील आर. व्ही. महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. उर्वरित मृत विद्यार्थ्यांमध्ये अरहान शरीफ, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आणि फरहान यांचा समावेश आहे.
अश्विन नायर हा मित्रांसोबत घरच्यांना न सांगता बाहेर पडला होता. मुलगा घरी झोपला आहे, असे समजत असतानाच पोलिसांचा फोन आल्यानंतर कुटुंबीयांना अपघाताची माहिती मिळाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनास्थळी केंद्रीय विभागाचे आयजीपी लाबुराम आणि एसपी चंद्रकांत यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचे मुख्य कारण अतिवेग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सर्व मृतदेह होस्कोटे सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले असून पहाटेच आपल्या लेकरांना गमावलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अपघातातील मृतांची नावे
अश्विन नायर (वय १७, रा. कोथनूर) – आरव्ही पीयू महाविद्यालय
अरहान शरीफ – सीएमआर स्कूल, रा. एचव्हीआर लेआउट
अयान अली (वय १७) – सीएमआर स्कूल
भरत (वय १८) – सीएमआर कॉलेज, रा. फ्रेझर टाऊन
एथन जॉर्ज (वय १७) – आरव्ही कॉलेज, रा. हुलिमावू
फरहान (वय १७)
गगन (वय २६) – रा. सर्व बंगळूर
या भीषण अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून अतिवेग आणि बेफिकीर वाहनचालना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.