पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्यात Sugar Research Australia (SRA) या जागतिक दर्जाच्या ऊस संशोधन संस्थेला भेट दिली जाणार आहे. या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह नामांकित शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
या आंतरराष्ट्रीय अभ्यासदौऱ्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी नवे तंत्रज्ञान, सुधारित ऊस वाण आणि साखर उतारा वाढविण्याच्या आधुनिक पद्धतींचा मार्ग खुला होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सहकार्याची दारे उघडण्याचीही शक्यता आहे.
शिष्टमंडळात डॉ. अशोक कडलक (मुख्य शास्त्रज्ञ : पीक उत्पादन व संरक्षण), डॉ. कपिल सुशीर (मुख्य शास्त्रज्ञ : ऊस प्रजनन विभाग) आणि डॉ. अशोक जगताप (शास्त्रज्ञ : रेणुजीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी विभाग) यांचाही समावेश आहे.
Sugar Research Australia ही संस्था ऊस उत्पादन, नफा आणि शाश्वतता वाढविण्यावर भर देत असून, नवीन ऊस जातींचा विकास, कीड व रोग व्यवस्थापन, स्मार्ट शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये आघाडीवर आहे. या भेटीदरम्यान स्पीड ब्रीडिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदलास प्रतिकार करणाऱ्या ऊस जाती, तसेच मिलिंग व प्रोसेसिंग तंत्रज्ञानातील सुधारणा यावर सखोल चर्चा होणार आहे.
या दौऱ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि Sugar Research Australia यांच्यात सामंजस्य करार (MoU) होण्याची शक्यता. हा करार झाल्यास संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान देवाणघेवाण, शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण आणि सुधारित ऊस वाणांच्या विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास तोंड देणाऱ्या ऊस जाती उपलब्ध होतील. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे, साखर कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि उद्योगाची टिकावधारकता मजबूत होणे अपेक्षित आहे.
“जगभरात साखर उद्योगात नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी Sugar Research Australia सोबत चर्चा करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.हा अभ्यासदौरा महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उद्योगासाठी परिवर्तनकारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.