नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नाना पाटेकर हे केवळ उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत सहज, प्रभावी आणि ताकदीच्या अभिनयातून त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी उमटवलेली अमीट छाप रसिकांच्या मनात सदैव कायम राहील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील जिव्हाळ्याच्या संबंधांची आठवण सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी माझ्यासाठी तसेच आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे.

अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सोडले नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या अभिनयाचा ठसा आणि सामाजिक कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत