लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा! ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ मोहिम गाव ते शहर पातळीवर राबवायलाच हवी

महाराष्ट्र

बदलापूर: बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळाबसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बदलापूर–कल्याण परिसर हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, शाळा बस व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा घटना रोखण्यासाठी गाव ते शहर पातळीवर ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ जनजागृती मोहिम राबवण्याची जोरदार मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित चिमुकली नेहमीप्रमाणे दुपारी शाळाबसमधून घरी परतत होती. मात्र ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्याने आईने बस चालकाला फोन करून विचारणा केली. त्यानंतर सुमारे दीड तास उशिरा मुलगी घरी परतली. ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. आईने विचारणा केली असता बस चालकाने तिच्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती मुलीने दिली. यानंतर पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित बस चालकाला अटक केली असून त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत संबंधित शाळा बस बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे. कल्याण आरटीओने संबंधित बसचा परवाना रद्द करत दंडात्मक कारवाई केली आहे. बसकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी संबंधित शाळा बसची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी शाळा प्रशासन, बस व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम भूमिका मांडली. तसेच महिला दक्षता समित्या तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. लहान मुलांना ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, शाळा बसमध्ये महिला सहाय्यकांची नियुक्ती होते का, चालकांची पार्श्वभूमी तपासली जाते का आणि शाळा व बस व्यवस्थेची नियमित तपासणी केली जाते का?

नागरिक, पालक आणि सामाजिक संघटनांकडून सर्व खाजगी व सरकारी शाळांची त्रैमासिक तपासणी, बस चालकांची सखोल पडताळणी, पालकांसाठी जागृती प्रशिक्षण आणि प्रशासनाने वर्षभर संवेदनशीलपणे काम करण्याची मागणी होत आहे.

घटना घडल्यानंतरची कारवाई नव्हे, तर आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या गेल्या तरच अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना कायमच्या थांबू शकतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.