मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आज मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे , विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारावेकर , विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास मंत्री छगन भुजबळ , मंत्री नारहरी झिरवळ , मंत्री गिरीश महाजन , मंत्री अतुल सावे , मंत्री दादा भुसे , मंत्री प्रताप सरनाईक , मंत्री पंकज भोयर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मेघदूत येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या सामाजिक, राजकीय आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव केला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले, आमदार बाबुराव कोळीकर, आमदार धनंजय गाडगीळ, आमदार मुरजी पटेल, आमदार मनीषा कायंदे, आमदार किरण सरनाईक, आमदार नारायण कुचे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार सुहास बाबर, आमदार प्रा. चंद्रकांत सोनावणे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार अशोकराव माने, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संजय बनसोडे, आमदार तुकाराम काते, आमदार अनंत तिडके, आमदार शरद सोनवणे, आमदार मनोज घोरपडे, आमदार भीमराव तापकीर, आमदार किशोर पाटील यांच्यासह पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, मराठा मोर्चा मुंबई समन्वयक विरेंद्र पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात बाळासाहेब देसाई यांना संगीतात्मक आदरांजलीही अर्पण करण्यात आली.
यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “मेघदूत हे देसाई कुटुंबासाठी केवळ शासकीय निवासस्थान नसून, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याच्या असंख्य आठवणी जपणारे एक भावनिक वारसास्थान आहे. मंत्री काळात याच निवासस्थानी १८ वर्षे देसाई यांनी वास्तव्य केले. राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, योजना, जनतेच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चा आणि लोकाभिमुख विचारांची परंपरा येथे जपली गेली आहे. बाळासाहेबांनी उभा केलेला लोकाभिमुख विचारांचा वारसा जपत आम्ही त्यांचे कार्य पुढे नेऊ, हीच या जयंतीनिमित्ताने खरी आदरांजली ठरेल.”