शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्यावर दगडफेक करत कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संपत गणपत काळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरुन संजय राजाराम काळे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडनदी किनारी असलेली पाण्याची विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेले असताना मोटारीवर संरक्षणासाठी टाकण्यात आलेल्या काट्या बाजूला करुन मोटारीजवळ पाणी आहे की नाही, याची पाहणी करत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने पाठीमागून त्यांच्या दिशेने फेकलेला दगड त्यांच्या पाठीवर लागला. हा दगड लागल्यानंतर नेमके काय घडत आहे, हे समजण्यापूर्वीच संजय राजाराम काळे याने “तुझी मोटार आताच्या आता उचल, नाहीतर तुला सोडणार नाही,” अशी धमकी देत हातातील कुऱ्हाड संपत काळे यांच्या डोक्यात मारली कुऱ्हाडीचा घाव बसताच त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. तशाच जखमी अवस्थेत संपत काळे यांनी सुरेश बाळासो काळे यांना फोन करुन मदत मागितली. त्यानंतर मयूर काळे आणि शिवाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला प्रथम निमोणे येथे उपचारासाठी नेले. पुढील उपचारांसाठी त्यांना शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले करत आहेत.
View this post on Instagram
शेतकऱ्याने पाणी उचलायचे की जीव वाचवायचा…?
शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या भागात शेतीच्या पाण्यावरुन, विद्युत मोटारींवरुन, पाइपलाइन तसेच नदीपात्रातील जागेच्या वापरावरुन वारंवार वाद निर्माण होत आहेत. मात्र, हे वाद प्रारंभीच्या टप्प्यातच मिटवण्यासाठी महसूल प्रशासन, जलसंपदा विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून प्रभावी समन्वय होत नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीला पाणी देण्यासाठी नदीकिनारी जाणेही जीवघेणे ठरणार असेल, तर ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था नेमकी कोणाच्या भरवशावर आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचे जर कुणी धाडस करत असेल, तर गुन्हेगारांना प्रशासनाचा धाक उरला आहे का…? याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
शिरूरच्या पुर्वभागात अवैध धंद्याचा सुळसुळाट; प्रशासन अवैध धंद्याच्या पाठीशी…?
शिरूरच्या पुर्वभागातील गावात गावठी दारु, गुटखा, जुगार, बेकायदेशीर मुरुम उपसा, माती उपसा अशा अनेक धंद्याना ऊत आला असुन पोलिस आणि महसूल प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. शिरूरच्या पुर्व भागातील काही गावात मुख्य चौकात असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात सर्रास दारुविक्री केली जात आहे. परंतु या दुकानाच्या मालकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काही दिवसांपुर्वी या दुकानावर कारवाईसाठी आले असताना संबंधित मालकाने त्यांच्यावर राजकीय दबाव आणल्यामुळे कारवाई न करताच अधिकारी माघारी परत गेले. त्यामुळे शिरूरच्या पुर्व भागात पोलिस आणि महसूल प्रशासनच अवैध धंद्याना पाठीशी घालत असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा
शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…