बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उसळलेला संताप अजूनही ओसरलेला नाही. राज्यभर आंदोलनं, आरोपींना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.
या हत्याकांडात नाव आलेले वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या मुलगा सुशील कराड याने सोशल मीडियावर टाकलेली एक ओळ सध्या वादळ उठवत आहे – “आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार.”
या एका वाक्याने बीडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुशील कराड नेमकं काय बोलणार? आतापर्यंत दडवलेले काही धक्कादायक सत्य बाहेर येणार का? की हा केवळ दबाव तंत्राचा भाग आहे? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
परळीतील हत्या प्रकरणाशीही दुवा?
दरम्यान, परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येचाही तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराड यांच्यावर आरोप असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेत संशयाची सुई सुशील कराडकडे वळल्याचे बोलले जात आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने थेट आरोप करत संरक्षणाची मागणी केली होती.
नार्को टेस्टचा अहवाल SITकडे
महादेव मुंडे हत्या प्रकरणात काही आरोपींची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आले होते. या चाचण्यांचा अहवाल विशेष तपास पथकाकडे (SIT) दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. या अहवालातून प्रकरणातील लपलेले धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे तपास यंत्रणा हालचालीत असताना दुसरीकडे सुशील कराडच्या ‘बोलणार’ या इशाऱ्यामुळे राजकीय समीकरणं ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे —
सुशील कराड नेमकं काय उघड करणार? आणि त्याने बीडच्या राजकारणात नवा भूकंप होणार का?