शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता आज (दि १५) रोजी जाहीर झाली. शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अशोक पवार यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु महायुतीच्या वतीने अजुनही अशोक पवार यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे निश्चित झालेले नसल्याने महायुतीतला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
अशोक पवार यांनी २००९ ते २०१४ आणि २०१९ ते २०२४ असे दोन वेळा शिरुर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आता तिसऱ्या वेळेस पवार हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असुन त्यांच्या विरोधात महायुतीकडुन नक्की कोण उमेदवार असणार हे अजुनही निश्चित झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिरुर-हवेली विधानसभेसाठी दादापाटील फराटे, चंदन सोंडेकर, शांताराम कटके तसेच भाजपाकडुन जयश्री पलांडे, प्रदीप कंद हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडुन ज्ञानेश्वर कटके हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. ज्ञानेश्वर कटके आता पक्षाकडे उमेदवारी मागणार की अपक्ष निवडणुक लढविणार की दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्या विरोधात नक्की कोण…? विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. तसेच तीन महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोसरी मतदार संघ वगळता शिरुर, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, हडपसर या सगळ्याच मतदार संघात खासदार अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले होते. आता मतदार पुन्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पसंती देणार की महायुतीच्या उमेदवाराला पसंती देणार हे मतदान झाल्यावरच उघड होईल.
शिरुरकर परंपरा मोडणार की इतिहास घडविणार…?
शिरुर तालुक्यातील मतदारांनी यापुर्वी माजी गृहराज्यमंत्री बाप्पुसाहेब थिटे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार लोकनेते स्वर्गीय बाबुराव पाचर्णे या सर्वांना दोनदा विधानसभेत जाण्याची संधी दिली. परंतु तिसऱ्या वेळेस मात्र माजी आमदार पाचर्णे आणि माजी आमदार गावडे यांना शिरुर तालुक्यातील सुज्ञ जनतेने नाकारले. त्याचप्रमाणे अशोक पवार यांनाही शिरुर तालुक्यातील मतदारांनी दोनदा विधानसभेत जाण्याची संधी दिलेली आहे. आता तिसऱ्या वेळेस शिरुर मधील सुज्ञ मतदार अशोक पवार यांना विधानसभेत पाठवत इतिहास घडविणार की आपली पुर्वीची परंपरा कायम राखत अशोक पवारांना नाकारणार हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी समजणार आहे.
आमदार अशोक पवार ‘हॅट्रिक’ च्या तयारीत…?
शिरुर-हवेली मतदार संघात अशोक पवार हे चौथ्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरत असुन राष्ट्रवादी पक्षात फाटाफुट झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. त्यावेळी लोकसभेच्या सहा मतदार संघापैकी शिरुर-हवेली मतदार संघात अशोक पवार यांनी कोल्हे यांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रचार केला. तसेच कोल्हे यांना शिरुर-हवेलीतुन चांगले मताधिक्य दिले. सध्या अशोक पवार हे विजयाची ‘हॅट्रिक’ करण्याची तयारी करत असुन त्यांना मतदार, महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच खासदार कोल्हे यांचीही भक्कम साथ मिळणार आहे.
MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अॅड अशोक पवार
शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार
मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर