रामलिंग महिला उन्नती आणि रामलिंग महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभ

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ज्ञानदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडत असतात. सध्या मोबाईल,फेसबुक यांचा अतिरेक होत असल्यामुळेआजची पिढी संस्कार विसरत चालली आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे असल्याचे मत शिरुर येथील ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या शकुंतला बेहनजी यांनी व्यक्त केले.

रामलिंग येथील रामलिंग सांस्कृतिक भवन येथे रामलिंग महिला उन्नती बहूउद्देशीय सामाजिक संस्था आणि रामलिंग महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच दिप्रज्वलन करुन करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा परीषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार म्हणाल्या रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने कायमच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यांचे सामाजिक काम हे इतरांसाठी प्रेरणादायी असुन राणी कर्डिले नेहमीच महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख असाच उंचावत राहो अशा शुभेच्छा देत त्यांनी कर्डीले याचं कौतुक केले. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्या राणी लंके यांनीही उपस्थित महिलांशी संवाद साधला.

यावेळी शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कारण ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा जास्त वेळ कामात जातो. परंतु आरोग्य उत्तम असेल तर आपण उत्तम राहू शकतो आणि कामही करु शकतो. त्यामुळे या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी करत उपस्थित महिलांना मोफत गोळ्या वाटप करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी सांगितले.

 

यावेळी रामलिंग व आसपासच्या परिसरातून सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी हळदीकुंकू समारंभ तसेच वाण वाटण्यात आले. यावेळी रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका शोभना पाचंगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिरुर तालुका अध्यक्षा विद्या भुजबळ, मोनिका जाधव, ग्रामपंचायत सदस्या अर्चना कर्डिले, छाया जगदाळे, वनिता चव्हाण, गायत्री डिंबरे तसेच मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी तर आभार संस्थेच्या सचिव गौरी पवार यांनी मानले.