काच फोडून कारमधून लॅपटॉप व रोकड चोरीला

क्राईम शिरूर तालुका

शिरूर पोलिसात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील व्यस्त भागात भरदिवसा एका सिव्हिल इंजिनिअरच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय सुनील मदगे (वय ३१), व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर व सरकारी ठेकेदार, रा. आदिनाथ नगर, शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ३:३० ते ६:३० या वेळेत व्यंकटेश हाइट समोर, बाबुराव नगर, शिरूर येथे त्यांची हुंडाई क्रेटा (क्रमांक MH 12 WU 6432) ही कार पार्क केली होती.

या दरम्यान अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून आतील बॅग चोरली. बॅगेमध्ये Lenovo कंपनीचा काळ्या रंगाचा IP 320-15ISK I34G1T मॉडेल लॅपटॉप (सिरीयल नंबर PF9XB8303018) अंदाजे किंमत ₹१५,०००/- आणि ₹३०,०००/- रोख रक्कम (₹१०० च्या २०० नोटा व ₹५०० च्या २० नोटा) होती. एकूण मुद्देमालाची किंमत ₹४५,०००/- इतकी आहे.

या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राऊत हे करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहरात दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरट्यांनी कारची काच फोडून लुटमार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी या घटनेचा गंभीरतेने तपास करून चोरट्याचा लवकरात लवकर माग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.