शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) परिसरात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या नर बिबट्याला अखेर वनविभागाने बुधवारी (दि ३) रोजी रात्री साडेदहा वाजता यशस्वीपणे जेरबंद केले. शेतकरी बबन सोनू बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा अंदाजे साडेचार ते पाच वर्षांचा बिबट्या अडकला. वनरक्षक लहू केसकर व वनपाल महेंद्र दाते यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करुन बिबट्याला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्याला माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले.
बिबट्याच्या हल्ल्याने वाढली दहशत…
शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही वर्षांपासुन बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे. नागरिकांसह पशुधनावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असून, मागील पाच ते सहा वर्षांत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पिंपरखेड, काठापूर खुर्द, जांबूत, शरदवाडी, वडनेर खुर्द, चांडोह व फाकटे या भागात मागील तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उसाच्या प्रचंड क्षेत्रामुळे बिबट्याला सुरक्षित आश्रय मिळत असल्याने तो दिवसाढवळ्या गावोगावी हिंडताना दिसतो.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…
बिबट्यांच्या दहशतीमुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावकऱ्यांनी शासनदरबारी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागाकडून नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी शेतात जाताना दोन-तीन जणांच्या समूहाने जाणे, हातात काठी ठेवणे, गळ्यात मफलर बांधणे, तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून सौर कुंपण उभारणे यासारख्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या नागरिकांना तात्पुरती सुटका मिळाली असली तरी या भागात अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार सुरुच असल्याने त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळेस विद्युत प्रवाह खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण
चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड
पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी