शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावातुन एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ४५०० किलो वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डाळिंबाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी शिंदोडी येथील शेतकरी शहाजी तुकाराम वाळुंज (वय ५०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०२ जुलै २०२५ दरम्यान शिंदोडी येथील गट नंबर १३ मधील अडीच एकर डाळिंब बागेतील अंदाजे ७५० झाडांवरील ४५०० किलो माल अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेला. या डाळिंब फळांची जात भगवा असून फळे लाल रंगाची, गोलसर आकाराची होती.

या मालाचा प्रति किलो दर १०० रुपये प्रमाणे, एकूण अंदाजे ४ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार टेंगले हे करत आहेत. शिरुर तालुक्यातील डाळिंब चोरीची हि तिसरी घटना असुन शेतकऱ्यांचे त्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.