न्हावरा फाटा व सतरा कमान चौक येथे सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

अपघात रोखण्यासाठी शिरूर पोलिसांची अभिनव पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाणारा पुणे–आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर मौजे न्हावरा फाटा आणि सतरा कमान चौक हे अपघातप्रवण ठिकाणे असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची नोंद आहे.

न्हावरा फाटा परिसरातून आहिल्यानगरकडून येणारी अवजड वाहतूक ही उतार असल्यामुळे जोरात येते. त्याच ठिकाणी चौक आणि रोड क्रॉसिंग एकत्र असल्याने वाहनचालकांना अंदाज न आल्याने अनेकदा धोकादायक परिस्थिती निर्माण होते. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच सतरा कमान चौकातही पुणेकडून येणाऱ्या वाहनांचा वेग उतारामुळे वाढतो आणि चौकाचा अंदाज न आल्यामुळे तीव्र अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश कजळे यांनी स्वतः दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी योग्य सूचना मिळाव्यात यासाठी या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवण्याचा प्रस्ताव पुढे नेला. या उपक्रमात सामाजिक उत्तरदायित्व जपत, IFB कंपनी (मौजे करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या एच.आर. हेड काशीराम मेस्री यांच्या माध्यमातून न्हावरा फाटा आणि सतरा कमान चौक या दोन्ही ठिकाणी एकूण चार सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल आज बसवण्यात आले. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी चौकाचा अंदाज घेणे वाहनचालकांसाठी सोपे होणार असून, अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिरूर पोलिसांनी केलेल्या या सकारात्मक आणि उपयुक्त पावलामुळे नागरिकांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने हा एक अनुकरणीय आदर्श ठरणार आहे.