Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) निजाम आणि इंग्रज काळापासुन अस्तित्वात असलेला ३३ फूट रुंदीचा दोन गावांना जोडणारा सार्वजनिक शिवरस्ता आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बसू लागला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतीच्या मालकी हक्काचा पुरेपूर उपयोग न करता आल्याने एका शेतकऱ्याने अखेर वैतागून आपली पाच एकर द्राक्ष बागा तोडून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

निमोणे येथील गट नंबर १०७७ आणि गुनाट येथील गट नंबर ४७० या दोन गटां दरम्यानचा ऐतिहासिक रस्ता सन १९९९ पासून स्थानिक भूमाफियांच्या अतिक्रमणामुळे बंद झाला आहे. महसूल विभागाने या रस्त्याची दोन वेळा फेरचौकशी केली असून, तीन तहसीलदारांनी रस्ता मोकळा करण्याचे आदेशही काढले आहेत. परंतु आजतागायत या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.

या संदर्भात दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनीही ठराव करून रस्ता मुक्त करण्याची मागणी केली आहे. मात्र तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. परिणामी, या रस्त्याअभावी संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अशक्यप्राय बनले आहे.

त्यामुळे शेतात पोहोचण्यासाठी पर्यायी आणि कायमस्वरुपी रस्ता उपलब्ध नसल्याने शेतीचे उत्पन्न तर बुडतेच आहे. शिवाय भविष्यातील नुकसानही टाळता येत नाही. त्यामुळे एका शेतकऱ्याने वैतागून पाच एकरची द्राक्ष बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करुन अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकरी नानासाहेब काळे यांनी केली आहे. अन्यथा या रस्त्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याचेही काळे यांनी सांगितले.

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल