शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा – केडगाव चौफुला रोडवरील आंधळगाव येथील सीएनजी पंपाजवळ सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाला गंभीर अवस्थेत ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून, शिरूर पोलीस ठाण्याकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस हवालदार व्ही.एस. पवार (सासवड पो.स्टे.) यांनी माहिती दिली की, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:१३ वाजता ग्रामीण रुग्णालय न्हावरा येथून १०८ अॅम्बुलन्सद्वारे डॉ. शहबाज तांबोळी यांच्या मार्फत सदर जखमी अनोळखी पुरुषाला पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या इसमास मृत घोषित केले. प्राथमिक चौकशीतून असे समोर आले की, सदर पुरुष हा मौजे आंधळगाव (ता. शिरूर, जि. पुणे) हद्दीतील न्हावरा ते केडगाव चौफुला रोडवरील सीएनजी पंपाजवळ आढळून आला होता.मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४५ वर्षे असून, अंगावर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट होती. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
शिरूर पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाचा पुरुष आपल्या ओळखीचा असल्यास अथवा त्याच्याबाबत काही माहिती असल्यास शिरूर पोलीस स्टेशन (दूरध्वनी क्र. ०२१३८-२२२१३९) किंवा मोबाईल क्रमांक ९५५२५६२३४२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.